पुसद शहरात सोनसाखळी चोरटे यांचा हैदोस…

पत्रे ले आउट येथील महिलेचे भल्या पहाटे गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे फरार..
पुसद शहरातील पत्रे-लेआउट मधील शांताकला नामदेव इंगळे या गृहिणी घरासमोरील अंगण स्वच्छ झाडत असताना बाईकवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी क्षणार्धात हिसकावून पोबारा केला. ही घटना आज सकाळी ६.५४ वाजता घडली. या घटनेने शहरात महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

भाजपचे आमदार निलय नाईक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार इंद्रनिल नाईक यांचे घर पत्रे लेआऊटमध्ये आहे. या परिसरात भल्या पहाटे अंगण झाडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीवर या चोरट्यांचा डोळा होता. यापूर्वी याच पत्रे- लेआउटमधील ताई शिरमवार यांच्या गळ्यातील सोनसाखळी एक महिन्यापूर्वी बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी याच पद्धतीने पळविली होती. पोलिसांना चकमा देणाऱ्या चोरट्यांनी शांताकला यांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचा डाव पुन्हा साधला. बाईकवरून या तिघा चोरट्यांनी शांताकला यांच्या घराची सुरुवातीला रेकी केली. दोघे जण बाईक घेऊन प्रा. पंचारिया यांच्या घरासमोर थांबले. एक जण चालत शांताकला यांच्या घरासमोर आला. त्याने क्षणात झटका मारून गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. झाडू घेऊन आरडाओरडा करत शांताकला चोरट्यामागे काही अंतर धावल्या. मात्र, बाईकवरील चोरट्यांनी ‘धूम स्टाईन’ने धूम ठोकली. या घटनेची तक्रार वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

पोलिसांनी पंचनामा केला. हे चोरटे शांताकला त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. तसेच पंचरिया याच्या घरासमोर बाईक घेऊन उभे असताना दोन चोरटे प्रा. केशव चेटुले यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडले आहेत. यापूर्वी देवदर्शन अथवा बाजारपेठेत निघालेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविण्याचे प्रकार पुसद शहरात घडले आहेत. आता मात्र या चोरट्यांनी अंगणात स्वच्छता करणाऱ्या महिलांना टारगेट केले आहे. पोलिसांनी हे चोरटे शहराबाहेरील हिंगोली परिसरातील असावेत, अशी शंका व्यक्त केली. पोलीस तपास सुरू आहे….