डीबी पथकाची कारवाई दुचाकी गाडी चोर अटकेत…
प्रतिनिधी/पुसद
पुसद शहरातील एस. कोचिंग क्लासेस व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उभी केलेली दुचाकी ऑगस्ट महिन्यात चोरीला गेली होती. दुचाकी चोरी गेल्याची तक्रार होताच डीबी पथकाने दुचाकीला व चोराला शोधण्यास सुरुवात केली. एका महिन्यातच डीबी पथकांने चार चोरांचा शोध घेतला असून एका आरोपीला अटक केली असता त्याचा पीसीआर मिळाला होता. पीसीआरमध्ये त्याच्या तीन साथीदारांनी संगणमत करून दुचाकीचे स्पेअर पार्ट वेगवेगळे करून भंगारात विक्रीच्या प्रयत्नात असल्याची कबुली दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ऑगस्ट महिन्यामध्ये एस कोचिंग क्लासेस समोरून नारायणदास गिरिधारीलाल बजाज वय 68 वर्ष रा. देवी वार्ड यांची ड्रीम युगा दुचाकी क्र.एम.एच.29,ए..पी.2264, ही चोरीला गेली होती. तर मनोज प्रसाद देशमुख वय 30 वर्षे रा. बांसी यांनी त्यांची टीव्हीएस स्टार सिटी दुचाकी क्रमांक एम. एच. 29, पी.4558 हि शासकीय कामाकरिता आले असता त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दुचाकी उभी केली होती. दोघांच्याही दुचाकी ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली असता अज्ञात चोरा विरोधात गुन्हे दाखल झाले होते. गुन्हे दाखल होताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेशचन्द्र शुक्ला व सहाय्यक पोलीस निरीक्षक परांडे यांच्या आदेशानुसार डीबी पथकाचे प्रमुख दीपक ताठे, जलाल शेख,गिरीश बेंद्रे,प्रफुल इंगोले यांनी त्यांच्या खबऱ्यांना दुचाकी चोरी गेल्याची माहिती दिली. त्यांच्या खबऱ्यांनी डीबी पथकाचे प्रमुख दीपक ताठे यांना दुचाकी चोरीतील एक आरोपी हा चोरीला गेलेल्या एम.एच.29 ए.पी.2264 ड्रीम युगाने पुसद येथे शुक्रवारी येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने दि.10 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या दरम्यान माहूर रोडवर सापळा रचला असता आरोपी अजय मधुकर जाधव वय 23 वर्षे रा. शिवानगर मोहा याला पकडण्यात यश आले. अटक केलेल्या अजयला पोलिसांनी पिसिआर घेतला असता त्यांनी गुन्ह्यातील इतर तीन आरोपीचे नावे पोपटासारखे सांगितले. दुचाकी चोरण्यासाठी चार आरोपींनी संगणमत करून दुचाकीचे स्पेअर पार्ट अलग अलग करून व तोडून भंगारमध्ये विकण्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली दिली. दुचाकी चोरणारे उमेश जगत जाधव रा. शिवनगर मोहा व त्याचे सोबती संतोष विठ्ठल मात्तमे रा. गहुली, परमेश्वर उर्फ बाबू साहेबराव वाघमारे रा.गहुली या आरोपींनी संगणमत करून दुचाकीचे स्पेअर पार्ट काढून विक्रीच्या प्रयत्नात असल्याची कबुली दिली आहे. दुचाकी चोरणारे इतर तीन आरोपींचा पोलिसांनी शोध लावला असून त्यांनाही तात्काळ अटक करणार असल्याची माहिती डीबी पथकाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक ताठे यांनी दिली आहे.