मराठी हायस्कूल मधील दहा संगणकासह इतर साहित्य चोरणारे तीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात..२ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त….
प्रतिनिधी । पुसद
नगर परिषद अंतर्गत पापालाल जैस्वार मराठी हायस्कूल मधील दहा संगणक संच प्रिंटर,प्रोजेक्टर,सीपीयु,वेब कॅमेरा, स्विच बोर्ड, कार्पेट,सीसीटीव्ही कॅमेरे असा मुद्देमाल दि.५ जून २०२३ रोजीच्या दुपारी १२ वाजताच्या दरम्यान चोरून नेल्याचे उघडकीस आले होते. शाळेतील साहित्य चोरून नेल्याची तक्रार मुख्याध्यापिका मंदा पान्हेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती.तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता व शासकीय साहित्याची चोरी झाल्याने शहर पोलीस स्टेशन खडबडून जागे झाले. त्यानंतर चोरट्याला मोठ्या सीताफिने पकडण्यात यश मिळविले आहे.
शेख आफताब शेख शमी रा. शिवाजी वार्ड,शिवम कार्तिक भालेराव रा.शिवाजी वार्ड व शुभम सुनील खंदारे रा.माहूर,ह. मु.लक्ष्मी नगर असे अटक केलेल्या चोरट्याची नावे आहेत. शहर पोलीस स्टेशनच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पापालाल जैस्वार मराठी हायस्कूलमधील संगणक कक्षामध्ये ठेवलेले साहित्य तीनही चोरट्यांनी संगणमत करून लंपास केले होते.त्यानंतर शासकीय साहित्याची चोरी झाल्याने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी तात्काळ गुन्ह्याबाबत डीबी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व त्यांची टीम,पोलीस हवालदार प्रफुल इंगोले,सिद्धोधन भगत,वैजनाथ पवार,आकाश बाभुळकर यांना योग्य त्या सूचना दिल्या.त्या सूचनाचे पालन करीत पोलीस उपनिरीक्षक लोकरे व त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले.परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी व चोरीस गेलेले संगणकाबाबत गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्याने त्याबाबत पोलीस निरीक्षक पांचाळ यांना माहिती देऊन त्यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे तीनही आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या घराची झेडती घेतली असता एकूण चार डेल कंपनीचे मॉनिटर व संगणक व इतर मुद्देमालासह चोरून घेऊन जाण्यासाठी वापरलेली महिंद्रा पिकअप वाहन असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.