महाविकास आघाडीच्या आंदोलनाला यश, उपोषणाची सांगता…

घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात..
नमुना ड साठी प्रशासन लागले युद्धपातळीवर कामाला…
पुसद/. महाविकास आघाडीच्या वतीने मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल होत लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वितरणास सुरूवात झाली नमुना ड साठी युद्ध पातळीवर प्रशासन कामाला लागले. लेखी आश्वसनानंतर आज साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली.
मात्र अखेरच्या पिढीतला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला.
शेकडो वर्षापासून शासकीय जागेवर राहणाऱ्यांना त्याच जागेवर मालकी हक्क प्राप्त होण्याच्या मागणीची दखल झाली. शासनाने तशा पद्धतीचे अध्यादेश काढले. नियम कायदे तयार झाले.
पुसद नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित केले. त्यानुसार लाभार्थ्याकडून कागदपत्रे व पंचनामे करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले. काही महाभागाने नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या मौखिक संमतीने लाभार्थ्याकडून मोजणी तातडीने होते अशी बतावणी करून प्रत्येकी 350 रुपये नमुना ड साठी घेतले.
त्यालाही चार वर्षे लोटल्या गेली. तरीही नमुना ड च्या लाभापासून नागरिक वंचित राहिले. घरकुल मंजूर होऊनही निधी मिळाला नाही यासह ज्यांना घर नाही त्या सर्व बेघराच्या प्रश्नाने जनता त्रस्त होती. या सर्व बाबीसाठी सत्तेत असताना नगरसेवक साकिब शाह यांनी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची चांगलीच कान उघडणे केली होती.
उपोषणाच्या मार्गाने घरकुल लाभार्थ्यांसाठी कोट्यावधीचा निधी खेचून आणला होता. त्यामुळे पीडित जागरूक जनता, त्रस्त नागरिक साकिब शाह यांच्याकडून मागण्या पूर्ततेची अपेक्षा व्यक्त करीत होते. शेवटी नाईलाजाने जनतेच्या अपेक्षा पूर्ततेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुसद शहर अध्यक्ष साकिब शाह यांनी 15 दिवसात घरकुलाचा रखडलेला निधी, नमुना ड व बेघरांना घराचा लाभ मिळवून देण्याच्या मागण्याची पूर्तता करावी म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती. लोकहिताच्या मागणीची माहिती होताच
वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस अल्पसंख्यांक लीगल सेल व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सोबत राहण्याची तयारी दर्शवली आणि साखळी उपोषणाच्या स्वरूपाने संयुक्तपणे महाविकास आघाडीची 16 जानेवारी 2024 ला साखळी उपोषणाची सुरुवात झाली.
आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या आंदोलनाला नागरिकांनी कुटुंबासह सहभाग नोंदविला. बिरसा मुंडा ब्रिगेड, भीम आर्मी, एमआयएम पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला. जागरूक नागरिकांनीही पुढाकार घेतला. तरीही नगर प्रशासन झोपलेलेच होते. उपोषणातील दिवसागणित गर्दी वाढतच होती.
नागरिकांचा संताप वाढतच होता. उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आपल्याला श्रेय घेता येणार नाही म्हणून लोकप्रतिनिधींनी प्रशासनामार्फत मागण्या रोखून ठेवल्याचा आरोप सुद्धा उपोषण कर्त्यानी केला होता. प्रशासन कुंभकर्णी झोपेत गेले. त्यामुळे आपल्या हक्काचे व अधिकाराचे मिळवण्यासाठी संतप्त उपोषणकर्त्यांनी ताला ठोकोचा इशारा दिला. तरीही प्रशासन जागले नाही.
थातूरमातूर उत्तराने टाळाटाळ करीत होते. शेवटी संतप्त आंदोलकांनी पोलिसांचा पोलिसांच्या दंडूके शाहीला न जुमानता जेलमध्ये जाण्याच्या मानसिकतेने नगरपालिकेला ताला ठोको चा आक्रमक पवित्र घेतला. त्याने प्रशासन खडबडून जागी झाले. त्यांची कुंभकर्णी झोप उडाली. लोकप्रतिनिधीला न जुमानता त्यांनी अखेर पंधरा दिवसात मागण्या पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले.
आंदोलनकर्त्यांनी ताला ठोकून आंदोलन स्थगित केले. मात्र साखळी उपोषण चालूच ठेवले. प्रशासन कामाला लागले. परंतु दिवसा मागे दिवस जात असल्याने शेवटी आज महाविकास आघाडीच्या वतीने साकिब शाह हे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देणारे पत्र दिले.
ताला ठोको च्या वेळी आंदोलन आक्रमक झाले होते आणि आता आमरण उपोषण केल्यास प्रशासनाच्या अंगलट येऊ शकते, अशी समज आल्याने उपोषणकर्त्यांच्या मागणीची नगरपालिकेने दखल घेतली. आणि घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यास सुरुवात केली व इतर मागण्यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे नगरपालिकेच्या वतीने लेखी पुरावे देऊन लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आले. मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांचे हस्ते उपोषणकर्त्यांना उसाचा रस पाजून आज उपोषणाची सांगता करण्यात आली.
यावेळी उपोषणकरते आंदोलक राष्ट्रवादी शहरात पवार गटाचे पुसद शहर अध्यक्ष साकीब शाह, वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, विजय बाबर, अर्जुन राठोड, इस्तेयाकभाई, जहीरभाई, डॉक्टर राऊत, सलीम भाई व आंदोलनाला पाठिंबा देणारे बिरसा ब्रिगेड चे पुसद तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांचे सह आदीजन यावेळी उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ज्या गोरगरिबांच्या मागण्यासाठी साखळी उपोषणाचा पवित्रा घेतला होता त्या मागण्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचत नाही तोपर्यंत पाठपुरावा करून निश्चितच मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी साकिब शाह व बुद्धरत्न भालेराव यांच्या वतीने देण्यात आली.