समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य जलदगतीने व्हावे..

– न्यायमूर्ती भूषण गवई
प्रतिनिधी हिंगोली.शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली _ दि. 22.02.2025 : सामाजिक व आर्थिक विषमता संपवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्यायदानाचे कार्य हे जलदगतीने आणि कमी खर्चात व्हावे, असा आशावाद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी व्यक्त केला.
आज येथील नवीन स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे व नवीन प्रशस्त न्यायालयीन ईमारतीचा लोकार्पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना भा. वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, नितीन सांबरे, नितीन सुर्यवंशी, यनशिवराज खोब्रागडे यांच्यासह आमदार तानाजी मुटकुळे, मुंबई उच्च न्यायालयाचे 30 ते 35 न्यायमूर्तीं, परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि नवीन न्यायिक जिल्ह्याचे पहिले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग एस. अकाली, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना न्यायमूर्ती श्री. गवई म्हणाले, स्वतंत्र न्यायिक जिल्हा व इमारतीचे उद्घाटन केल्याबद्दल वकील संघाचे अभिनंदन करून, स्वतंत्र जिल्हा झाल्यानंतर आता हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाची सर्व सोयीसुविधांनी युक्त भव्य आणि देखणी अशी उत्कृष्ट इमारत बांधली आहे.
अमरावती, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाची इमारत स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय सुरु करण्यासाठी व न्यायालयासाठी लागणारी नवीन इमारत यासाठी चांगली भूमिका निभावल्याबद्दल विधी विभाग, प्रशासनाचे त्यांनी अभिनंदन केले.
या इमारतीतून समाजातील सामाजिक आर्थिक विषमता दूर करत समाजातील शेवटच्या नागरिकाला जलदगतीने कमी वेळेत, कमी खर्चात न्याय मिळाला पाहिजे, असा आशावाद व्यक्त केला.
नैसर्गिक न्यायाचा हक्क हा शेवटच्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. येथील न्यायालयाचे इमारत बांधकाम उत्कृष्ट झाले आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामाबाबत कुठेही मागे नसल्याचे सांगून ही इमारत स्वच्छ ठेवण्यावर भर देत न्यायालयीन इमारत परिसरात वृक्षारोपण करत पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांच्या मूलभूत हक्काची पायमल्ली होता कामा नये. त्यासाठी न्यायाधीश, वकील आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रयत्न करावेत.
हिंगोली जिल्ह्यात जन्मलेल्या संत नामदेवांनी 13 व्या शतकात सामाजिक, आर्थिक न्यायाचे बिजारोपण केले होते. नरसीपासून ते पंजाबपर्यंत यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे सांगितले.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांनी या कार्यक्रमासाठी ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करताना म्हणाले, ज्या ज्या वेळी या भागात येतो तेव्हा अधिक आपुलकीची भावना निर्माण होते.
येथे वडिलांचा नोकरीनिमित्त बराच काळ गेल्याचे सांगत ते जुन्या आठवणीत रमले. विधी सेवा प्राधिकरणाचा पदभार न्यायमूर्ती गवई यांनी स्वीकारल्यानंतर नालसा या गिताचा मराठीत अनुवाद पूर्ण झाला असून लवकरच ते मराठीत येईल.
यावेळी न्यायमूर्ती गवई यांची लवकरच देशाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती होणार असून ते देशाची न्यायव्यवस्था समर्थपणे सांभाळतील याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र भूमी ही संत महात्म्याची भूमी म्हणून ओळखली जाते. नवीन इमारतीत न्यायदानाचे काम अधिक प्रभावी व गतिशील होईल, असा विश्वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांनी व्यक्त केला.
या इमारतीतून न्यायदानाचे पवित्र कार्य होते. ते पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे सांगून इमारत स्वच्छतेवर यंत्रणेने विशेष लक्ष देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांनी नवीन न्यायालयीन इमारत हे आपल्या कार्यक्षमता, न्यायव्यवस्थेच्या शुद्धतेचा पाया आहे.
या नवीन इमारतीत न्यायदानाचा गतिशील आदर्श घालवून द्यावा, असे सांगितले.
पालक न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे यांनी हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी हिंगोली जिल्हा आजपासून स्वतंत्र न्यायिक जिल्हा म्हणून घोषित झाल्याबद्दल अभिनंदन केले.
यामुळे आजपासून जिल्ह्यातील नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार तानाजी मुटकुळे यांनी स्वतंत्र हिंगोली न्यायिक जिल्हा झाला आहे. हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहावा, असा आहे.
नवीन इमारत व जिल्हा न्यायालयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास दृढ होत जावो, असे सांगून न्यायाधीश, वकीलांच्या प्रशिक्षण केंद्रांसाठी मागणीचा पाठपुरावा शासनदरबारी करणार असल्याचे सांगितले.
परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांनी हिंगोलीसाठी आज स्वतंत्र न्यायालय झाले असल्याचे सांगून न्यायदानाचे कार्यही तितकेच उच्च दर्जाचे होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. सतीश देशमुख यांनी केले. तर शेवटी आभार हिंगोलीचे नव नियुक्त प्रमुख व जिल्हा व सत्र न्यायाधीश तुफानसिंग अकाली यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व कोनशीलेचे अनावरण करुन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय नागरिकांची सनद आणि त्यांचे अधिकार याची माहिती देणारे ‘एक मुठ्ठी आसमा हे’ नालसा गीत सादर करण्यात आले.
उर्मिला जगताप व देवयानी गायकवाड यांनी स्वागत गीत गायिले.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर व समाजसेवक मधुकरराव मांजरमकर यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ताम्हणे, गजानन नंदनवार आणि प्रियंका पमनानी यांनी केले.
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला सर्व न्यायाधीश, न्यायिक अधिकारी, कर्मचारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.