विदर्भाच्या सुपुत्राला मिळाला बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वाचा मान…
पुसद/. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मुंबई येथील कार्यालयामध्ये बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्य पदाकरिता आज दिनांक १६/३/२०२४ रोजी निवडणूक पार पडली.
त्यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्हयातील पुसद या तालुक्याच्या ठिकाणी वकीली करणारे प्रख्यात विधिज्ञ ॲड आशिष पंजाबराव देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली.
बार कौन्सिल ऑफ इंडिया ही विधिज्ञांची देशातील सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. या संस्थेवर भारतातील सर्व राज्यामधून एक एक प्रतिनिधी निवडल्या जातो.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्याच्या संयुक्त बार कौन्सिल तर्फे एक प्रतिनिधी बार कौन्सिल ऑफ इंडियावर पाठविला जातो.
त्याप्रमाणे सदर प्रतिनिधीची निवड करण्या संदर्भात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या निर्वाचित २५ सदस्यामधून निवडणूकीव्दारे केली जाते.
ॲड आशिष पंजाबराव देशमुख यांनी या पदासाठी नामांकन अर्ज सादर केला त्या अर्जास सूचक म्हणून पुणे येथील प्रख्यात विधिज्ञ ॲड हर्षद निबांळकर व अनुमोदक म्हणून ठाणे येथील प्रख्यात विधिज्ञ ॲड. गजानन चव्हाण यांनी स्वाक्षरी केली.
ॲड. आशिष पंजाबराव देशमुख यांचा केवळ एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी श्रीमंतो सेन व सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रविण रणपिसे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याबाबतची घोषणा करुन त्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली.
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या इतिहासामध्ये तालुक्याच्या ठिकाणी काम करणा-या वकिलाची ॲड.आशिष पंजाबराव देशमुख यांच्या रुपाने पहिल्यांदाच निवड झाली. तसेच विदर्भाला सुध्दा हा मान पहिल्यांदाच प्राप्त झाला.
ॲड.आशिष पंजाबराव देशमुख यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲड. आशिष पंजाबराव देशमुख हे महाराष्ट्र आणि गोवा राज्य मिळवून सर्वाधिक मते मिळवून पहिल्या क्रमांकावर सन २०१९ साली सदस्य म्हणून निवडूण आले हे विशेष..