पुसद येथे शिव सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन….
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९२ व्या जयंतीनिमित्त शिवसामान्य ज्ञानस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय जीवनात छत्रपती शिवरायांच्या प्रेरक इतिहासाची उजळणी व्हावी आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी कौशल्य प्राप्त व्हावे या हेतूने दरवर्षी परीक्षेचे निःशुल्क आयोजन केले जाते. येथील भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेने स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित स्पर्धेत फक्त शिवचरित्रावर आधारित पन्नास गुणांची परीक्षा घेतल्या जाणार आहे. दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित परीक्षेचे दोन गट आहेत. इयत्ता चवथी ते सातवीचा अ गट असून सकाळी ११ ते १२ आणि इयत्ता आठवी ते बारावीचा ब गट दुपारी १ ते २ या वेळेत परीक्षा संपन्न होणार आहे. पुसद शहराव्यतिरिक्त शेंबाळपिंप्री व हिवरा येथे परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिनांक १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत शाळेतच नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इंग्रजी व मराठी माध्यमाची स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र असून उत्तरे लिहिण्यासाठी OMR शीट आहे. अचूक पर्यायाला काळया किंवा निळ्या पेनने अचूक गडद करायचे आहे. स्पर्धेतील विजेत्यांना गटनीहाय स्वतंत्र बक्षिसे दिल्या जाणार आहेत. प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धकाला रू २५००, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय करिता रू २०००, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तर तृतियकरिता रू १५००, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह दिल्या जाणार आहे. सर्व बक्षिस व स्पर्धेचे प्रायोजकत्व भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेने स्वीकारले आहे. मागील वर्षी समितीने ऑनलाईन स्पर्धा घेतली होती त्यामध्ये सुमारे ५००० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. यावर्षी कोविड १९ च्या नियमांचे पालन करीत दोन गटात वेगवेगळ्या वेळेत परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवावा असे आवाहन शिव सामान्य ज्ञान परीक्षा प्रमुख चंद्रकांत ठेंगे यांनी केले आहे. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ गणेश पाटील, शिवप्रबोधनपर्व प्रमुख राजेश साळुंखे, शोभायात्रा प्रमुख प्रा अजय क्षीरसागर, मोटारसायकल रॅली प्रमुख अभिजित पानपट्टे, नितीन पवार तथा सर्व समिती सदस्यांचे सहकार्य मिळत आहे.